हादग्याची गाणी | भोंडल्याची गाणी | भुलाबाईची गाणी

भोंडल्याचे प्रसिद्ध गाणे:

1)ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा

ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पारवं घुमतय पारावरी
मांडला ग मांडला  वेशीच्या दारी,
पारवळ घुमतं बुरजावरी
गुंजावनी डोळ्यांच्या साजीव टिक्का,
आमच्या गावच्या भुलोजी नायका
एवीन गाव तेवीन गाव,
कांडा तिळूबाई तांदूळ घ्या
आमच्या आया तुमच्या आया,
खातील काय दूधोंडे
दूधोंड्यांची लागली टाळी,
आयुष्य दे रे ब्रम्हाळीं
माळी गेला शेता भाता
पाऊस पडला येता जाता
पड पड पावसा थेंबोंथेंबी
थेंबाथेंबी आळव्या लोंबी
आळव्या या लोंबती अंगणा
अंगणात होती सात कणसं
हादग्या तुझी सोळा वर्ष
अतुल्या मतुल्या चरणी चातुल्या,
चरणी चारचोडे, हातपाय खणखणीत गोडे
एकेक गोडा विसाविसाचा, साडया डांगर नेसायच्या
नेसा गं नेसा बाहुल्यांनो, अडीच वर्षे पावल्यांनो


2) Akkan Mati Chikkan Mati / अक्कण माती चिक्कण माती

अक्कण माती चिक्कण माती खळगा तो खणावा 
अस्सा खळगा सुरेख बाई जातं ते रोवावं
अस्सा जातं सुरेख बाई रवा पिठी काढावी
अश्शी रवा पिठी सुरेख बाई करंज्या कराव्या
अश्या करंज्या सुरेख बाई तबकी भराव्या
अस्सं तबक सुरेख बाई शेल्याने झाकावे
अस्सा शेला सुरेख बाई पालखीत ठेवावा
अशी पालखी सुरेख बाई माहेरा धाडावी
अस्सं माहेर सुरेख बाई खायला मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडोनी मारीतं
अस्सं आजोळ गोड बाई खेळायला मिळतं 


3)श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं.



श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं.
असं कसं वेडं माझ्या नशिबी आलं

वेडयाच्या बायकोने केले होते लाडू
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले
वेडयाच्या बायकोने केला होता चिवडा
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
केरकचरा म्हणून त्याने बाहेर फेकला
वेडयाच्या बायकोने केल्या होत्या करंज्या
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
होडया होडया म्हणून त्याने पाण्यात सोडल्या
वेडयाच्या बायकोने केल्या होत्या चकल्या
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
बांगडया बांगडया म्हणून त्याने हातात घातल्या
वेडयाच्या बायकोने केले होते श्रीखंड
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
क्रीम क्रीम म्हणून त्याने तोंडाला फासले
वेडयाच्या बायकोने केल्या होत्या शेवया
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
गांडूळ गांडूळ म्हणून त्याने फेकून दिल्या.
वेडयाची बायको झोपली होती
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकले

4)नणंदा भावजया दोघी जणी

नणंदा भावजया दोघी जणी
घरात नव्हतं तिसरं कोणी
शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी
मी नाही खाल्लं वहिनीनी खाल्लं
आता माझा दादा येईल गं
दादाच्या मांडीवर बसेन गं
दादा तुझी बायको चोरटी
असेल माझी गोरटी
घे काठी घाल पाठी
घराघराची लक्ष्मी मोठी

5)कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून |



कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून || धृ ||
काय रे मागतोस बाळा तुला देते मी आणून
आई मला चंद्र दे आणून, त्याचा चेंडू दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून…||1||
आई मला विंचू दे आणून त्याची अंगठी दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून….||2||
आई मला साप दे आणून त्याचा चाबूक दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून…||3||

6) एक लिंबू झेलू बाई दोन लिंबं झेलू



एक लिंबू झेलू बाई दोन लिंबं झेलू
दोन लिंबं झेलू बाई तीन लिंबं झेलू
तीन लिंबं झेलू बाई चार लिंबं झेलू
चार लिंबं झेलू बाई पाच लिंबं झेलू
पाचा लिंबांचा पाणोठा
माळ घाली हनुमंताला
हनुमंताची निळी घोडी
येता जाता कमळं तोडी
कमळाच्या पाठीमागे लपली राणी
अगं अगं राणी इथे कुठे पाणी
पाणी नव्हे यमुना जमुना
यमुना जमुनाची बारिक वाळू
तेथे खेळे चिल्लारी बाळू
चिल्लारी बाळाला भूक लागली
सोन्याच्या शिंपीने दूध पाजले
पाटावरच्या गादीवर निजविले
निज रे निज रे चिल्लारी बाळा
मी तर जाते सोनार वाडा
सोनार दादा सोनार दादा
गौरीचे मोती झाले की नाही
गौरीच्या घरी तांब्याच्या चुली
भोजन घातले आवळीखाली
उष्टया पत्रावळी चिंचेखाली
पान सुपारी उद्या दुपारी


7)आज कोण वार बाई । आज कोण वार?


आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे सोमवार । शंकराला नमस्कार ।

आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे मंगळवार । देवीला नमस्कार ।

आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे बुधवार । बृहस्पतीला नमस्कार ।

आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे गुरुवार । दत्ताला नमस्कार।

आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे शुक्रवार । अंबाबाईला नमस्कार ।

आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे शनिवार । शनिला नमस्कार ।

आज कोण वार बाई । आज कोण वार ?
आज आहे रविवार । सुर्याला नमस्कार ।


8)यादवराया राणी घरास येईना कैसी


यादवराया राणी घरास येईना कैसी

सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी

सासूबाई गेल्या समजावयाला

चल चल सूनबाई अपुल्या घराला

अर्धा संसार देते तुजला

मी नाही यायची अपुल्या घराला

यादवराया राणी घरास येईना कैसी

सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी

सासरे गेले समजावयाला

चल चल सूनबाई अपुल्या घराला

तिजोरीची चावी देतो तुजला

मी नाही यायची अपुल्या घराला.

यादवराया राणी घरास येईना कैसी

सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी

दीर गेले समजावयाला

चला चला वहिनी अपुल्या घराला

नवीन कपाट देतो तुम्हाला

मी नाही यायची अपुल्या घराला.

यादवराया राणी घरास येईना कैसी

सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी

जाऊ गेली समजावयाला

चला चला जाऊबाई अपुल्या घराला

जरीची साडी देते तुम्हाला

मी नाही यायची अपुल्या घराला.

यादवराया राणी घरास येईना कैसी

सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी

नणंद गेली समजावयाला

चल चल वहिनी अपुल्या घराला

चांदीचा मेखला देते तुजला

मी नाही यायची अपुल्या घराला.

यादवराया राणी घरास येईना कैसी

सासूरवाशीण सून रूसून बसली कैसी

पती गेला समजावयाला

चल चल राणी अपुल्या घराला

लाल चाबूक देतो तुजला

मी येते अपुल्या घराला

यादवराया राणी घरास आली कैसी

सासूरवाशीण सून घरास आली कैसी


9)शिवाजी आमुचा राजा



शिवाजी आमुचा राजा

त्याचा तो तोरणा किल्ला

किल्ल्यामधे सात विहिरी

विहिरीमधे सात कमळे

एक एक कमळ तोडिलं

भवानी मातेला अर्पण केलं

भवानी माता प्रसन्न झाली

शिवाजी राजाला तलवार दिली

तलवाऽऽरंऽऽ घेऊनी आला

हिंदूंचाऽऽ राजा तो झाला


10)आड बाई आडोणी,


आड बाई आडोणी,
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडली सुपारी,
आमचा भोंडला दुपारी ।।

आड बाई आडोणी
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडली मासोळी
आमचा भोंडला संध्याकाळी ।।

आड बाई आडोणी
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडली कात्री
आमचा भोंडला रात्री ।।

आड बाई आडोणी
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडला शिंपला
आमचा भोंडला संपला

******************

0 comments: