जीवनाचे घड्याळ

जीवनाचे घड्याळ... नुसतं घड्याळ नाही, तर ते आहे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा एक सुंदर प्रवास. प्रत्येक अंक फक्त वेळ दाखवत नाही, तर जीवनातील एका महत्त्वाच्या टप्प्याची आठवण करून देतो.
१ - जन्म: हा प्रवास सुरू होतो, जेव्हा आपण या जगात येतो. एक निरागस, नवीन सुरुवात.
२ - बालपण: हा काळ म्हणजे खेळ आणि निरागसता. चिंता-मुक्त आणि आनंदाचा काळ, जिथे प्रत्येक दिवस एक नवीन शोध असतो.
३ - खेळ: बालपणातला हा महत्त्वाचा भाग. खेळ आपल्याला जगायला शिकवतात, टीमवर्क आणि हार-जीत स्वीकारायला शिकवतात.
४ - स्वप्नं: हळूहळू आपण मोठं होतो, आणि डोळ्यासमोर येतात अनेक स्वप्नं. काहीतरी मोठं करण्याची जिद्द आणि आकांक्षांचा टप्पा.
५ - प्रवास: आता खरी धावपळ सुरू होते. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रवास, जिथे प्रत्येक पाऊल आपल्याला पुढे घेऊन जातं.
६ - प्रेम: आयुष्याला एक वेगळीच उब मिळते. नात्यांना, भावनांना एक अर्थ प्राप्त होतो आणि आपण एकटे नाही हे जाणवतं.
७ - संघर्ष: आयुष्य आपली परीक्षा घेतं, अडथळे येतात. हाच काळ असतो, जिथे आपण आतून अधिक मजबूत आणि कणखर बनतो.
८ - यश: मेहनतीचं फळ मिळतं आणि स्वप्नं प्रत्यक्षात उतरतात. हा क्षण आपल्याला आपल्या प्रयत्नांची जाणीव करून देतो.
९ - शांतता: या टप्प्यावर मनाला समाधान मिळतं. आयुष्याचा खरा अर्थ समजून येतो, आणि आपण शांततेने प्रत्येक क्षण अनुभवतो.
१० - आठवणी: आयुष्याच्या या टप्प्यावर आपण मागे वळून पाहतो. जगलेल्या क्षणांची, अनुभवलेल्या आठवणींची उजळणी करतो.
११ - म्हातारपण: शरीर थकून गेलेलं असलं, तरी मनातील अनुभवाचा साठा अमूल्य असतो. हा काळ असतो जुन्या आठवणींमध्ये रमण्याचा आणि आयुष्याकडे कृतज्ञतेने पाहण्याचा.
१२ - शेवट: जीवनाची सांगता.

हे घड्याळ आपल्याला हेच सांगतं की, जीवनातील प्रत्येक टप्पा महत्त्वाचा आहे. बालपणाची निरागसता असो, तारुण्याचा संघर्ष असो, यशाचा आनंद असो, किंवा म्हातारपणातली शांतता असो... या सगळ्यांतूनच आयुष्य पूर्ण होतं.

"एखाद्या गोष्टीचा शेवट म्हणजे त्याची नवी सुरुवात…"
ही ओळ आपल्याला जीवनाची क्षणभंगुरता आणि त्याचवेळी प्रत्येक क्षण कृतज्ञतेने जगण्याची आठवण करून देते.
 मृत्यू हा सुद्धा शेवट नसून, एका नवीन प्रवासाची सुरुवात असते.

सहज नजरेत आलेला हा फोटो खूप आवडला आणि जगण्याकडे positive दृष्टिकोन बनवण्यासाठीच हा लेख लिहिण्याचा प्रयत्न.....
!!श्री स्वामी समर्थ!!
@सोनाली कुलकर्णी 

लेख आवडला तर नक्की शेअर करावा आणि नवीन लेख वाचण्यासाठी follow नक्की करा..!!

#lifelessons #आयुष्य #fbviralpost2025シ #fbpost #viralpost2025 #ShareThisPost #followmeplease #followers #highlight
त्याने तिला विचारलं  Are you happy with me..m??

त्याने तिला विचारलं,
"Are you happy with me...?"

क्षणभरही न थांबता
तिने उत्तर दिलं "हो..."

पण त्या 'हो'च्या उत्तराने
त्याच्या हृदयात प्रश्नांची वावटळ पेटली.

कारण…
जवळ असूनही अंतर वाढतं,
हात हातात असले तरी ऊब हरवते,
डोळे भिडतात पण
भावनांना शब्दांची आस लागून राहते.

सोबत असतानाही
एकटेपणाची सावली का भासते?
स्पर्श असतो, मिठी असते,
पण मनामनांतल्या रिकाम्या जागा
भरल्या का जात नाहीत?

तिच्या उत्तरातलं "हो" खरं असलं,
तरी तिच्या नजरेतलं मौन
त्याला वेदना देत राहतं.

त्याच्या आत एक हळवी तगमग 
"आपलं प्रेम जिवंत आहे ना अजून?
की आपण फक्त एकत्र आहोत,
पण मनं हरवून बसलोय?"

प्रेम आहे, नक्कीच आहे,
पण त्या प्रेमाला
मोकळा श्वास घेण्यासाठी
संवादाची खिडकी उघडीच नाही.

आणि म्हणूनच...
तिच्या "हो" च्या मागे दडलेलं
ते न बोललेलं 'पण'
त्याच्या हृदयाला
रोज थोडं थोडं जखमी करत राहतं...
@ सोनाली कुलकर्णी 

#fbpost2025シ #त्याचीवेदना #प्रेम #नातं #संवाद #realationship #LifeLessons #followers #highlightseveryone
गोड बोलणारी लोक जास्त आपली का वाटतात??

हल्ली लोकांना "गोड बोलणारे" लोक जास्त आवडतात. कारण गोड बोलण्यात गोडवा आहे, आपुलकी आहे, समोरच्या माणसाला आनंद देणारा एक हलकासा स्पर्श आहे. 
पण "खरे बोलणारे" लोक बहुतेक वेळा टाळले जातात ,नको वाटतात. कारण खरं बोलणं म्हणजे सत्य मांडणं, आणि सत्य हे नेहमीच कडू असत .

गोड बोलणारे लोक आपल्याला हसवतात, वर वर का होईना कौतुक करतात, आपण जे करतो त्याला बिनधास्त पाठिंबा देतात. खूपदा त्यांच्यासोबत राहिलं की अहंकार सुखावतो, मनाला समाधान मिळतं. पण खरे बोलणारे लोक आरसा दाखवतात. आपल्यातल्या चुका, कमतरता, चुकीचे निर्णय हे ते स्पष्टपणे सांगतात. म्हणून त्यांचं बोलणं टोचतं, कडवट वाटतं,नकोस वाटत.

खरं म्हणजे प्रत्येकाला दोन्ही प्रकारचे लोक हवे असतात. गोड बोलणारे लोक आपल्याला आत्मविश्वास देतात, आणि खरे बोलणारे लोक आपल्याला घडवतात. पण दुर्दैवाने आज लोक "सत्य" स्वीकारायला तयार नाहीत. सत्याला भिडण्याची हिंमत कमी झाली आहे. म्हणूनच "गोड बोलणाऱ्यांची" गर्दी आयुष्यात जास्त करून घेतात, आणि मनापासून "खरे बोलणारे" एकटे पडतात.

मात्र आयुष्य खरंच बदलवणारे, प्रगतीच्या मार्गावर नेणारे हे गोड बोलणारे नसतात, तर खरे बोलणारेच असतात ,ज्यांना खरंच तुमच्या बद्दल काळजी असते ,त्यांना तुमचं खरंच चांगल झालेलं पाहायचं असत. तुम्ही चुकत असाल तर ते आपल्याला टोकतात , ते तुमच्याबाबतीत परखड मत व्यक्त करतात.वेळेअगोदर सावध करण्याचा प्रयत्न करतात.जरी ते शब्द कडू वाटले तरी आपल्याला सत्य दाखवतात, चुका लक्षात आणून देतात, योग्य मार्ग दाखवतात.

लोकांना बहुतेकदा आपल्या भावनांना सुखावणारे शब्द हवे असतात, म्हणून ते गोड बोलणाऱ्यांना जवळ करतात.
पण आपल्या चुका दाखवणारे सत्य मनाला टोचतं, म्हणून खरे बोलणाऱ्यांना दूर ठेवतात.
खरं तर गोड बोलणं तात्पुरता आनंद देतं,
आणि खरं बोलणं आयुष्य बदलून टाकतं.

म्हणूनच, ज्यांच्याकडून आपल्याला खरं बोलून ऐकावं लागतं, त्यांना दूर न ढकलता, त्यांचा सन्मान करायला शिकायला हवं. कारण खरे बोलणारे लोक हे आपल्याला हवे असतात जरी त्या क्षणी ते नकोसे वाटले तरीही आपले चुकते पाऊल सावरण्यासाठी...!!
@सोनाली कुलकर्णी 

#lifelessons #relationship #follwers #highlights #fbpost2025シ #अनुभवाचेबोल
गरज .....

जेव्हा तुम्ही कोणासाठी गरजेचे असता, तेव्हा ती व्यक्ती तुमच्यासोबत फक्त नुसती गरजेपोटी कधीच नसते. 
तुम्ही त्या व्यक्तीच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग बनता,
तुम्ही त्यांच्या आनंदात, दु:खात, यशात आणि अपयशात त्यांच्यासोबत कायम राहता . तुमचं अस्तित्व , तुमचं असणं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं, कारण तुमचा त्यांना मानसिक आणि भावनिक आधार वाटतो. तुमच्यासोबत असताना त्यांना सुरक्षित वाटतं.

पण जर तुम्ही फक्त समोरच्याची एक गरज असाल, तर तुमचं अस्तित्व एका ठराविक हेतूसाठी किंवा फायद्यासाठीच असतं. 
तुमचा वापर फक्त तात्पुरत्या गरजेसाठी केला जातो आणि जेव्हा ती गरज पूर्ण होते, तेव्हा तुमची किंमत कमी होते. अशा नात्यात भावनिक हा भागच नसतो. हे नातं फक्त स्वार्थावर आधारित असत, जिथे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा फक्त फायदा घेते.
अशा नात्यांमध्ये नेहमीच असुरक्षितता वाटू लागते आणि भावनांचाशून्य नात जाणवू लागत.

गरजेच असण आणि गरज असण या दोन्हीमधील फरक ओळखणं खरंच खूप गरजेचं आहे. जर तुम्ही एका व्यक्तीसोबत फक्त गरज म्हणून जोडलेले असाल, तर ते नाते जास्त काळ टिकत नाही मग ते नाते कोणतेही असो . अशा नात्यांमध्ये तुम्हाला कधीच खरे प्रेम आणि आदर मिळत नाही. म्हणूनच, आपण आपल्या आयुष्यात कोणत्या प्रकारच्या नात्यांना जास्त महत्त्व देतो , हे ठरवण्यासाठी हा फरक ओळखणं खरंच महत्त्वाचं आहे. खालील फोटोमधील हा qoute मला खरंच मनोमनी पटला..म्हणूनच...हे सारं लिहिण्याचा.. प्रयत्न...
@सोनाली कुलकर्णी 
#relationships #follower #fbpost2025シ #lifelessons #spandankavitaa


रिकामा बाकडा आणि तुझी आठवण...

कोसळणाऱ्या पावसात,
तो बाकडा अजूनही तसाच 
ओलसर, थेंबांनी भिजलेला,
पण तुझ्या स्पर्शाशिवाय कोरडा…

एकेकाळी
इथे बसायचो आपण,
हातात हात,
डोळ्यांत असंख्य स्वप्नांची गर्दी,
आणि मनात प्रेमाचा ओलावा साठवून...

आज मात्र
तो ओलावा फक्त पावसाचा आहे,
मनाचा नाही.
थेंब पडतात,
पण त्यात आपल हास्य मिसळत नाही.

पाऊस आणि मी 
दोघंही सारखेच वाटतो,
तू येशील या आशेने धावून येणारे,
पण अखेरीस
फक्त रिकाम्या आठवणी घेऊन परत जाणारे.

हा बाकडा
आता फक्त आठवण आहे
आपल्या हळव्या प्रेमाचा साक्षीदार,
जो आजही वाट पाहतोय,
तुझ्या परत येण्याची…
अगदी माझ्यासारखा....😌
@सोनाली कुलकर्णी

#आठवण #आठवणी #प्रेम #couplelove 
#fbpicturepost #fbpost2025シ #fbpost #मराठीकविता #follower #followme #followmeplease
मैत्री दिनाच्या शुभेच्छा 🙏


खरतरं...वय वाढलं तसे..अनेक आयुष्यात गोष्ठी बदलत जातात...
प्रत्येक नात बदलत जातं....
आज मैत्री विषयावर थोडास लिहावं म्हणलं पण....प्रकर्षाने जाणवून आले ते मैत्रीचे बदलले स्वरूप...वाचायला थोडस कटू वाटेल पण....पण ..खर सत्य मांडण्याचा प्रयत्न...

एक काळ होता, जेव्हा मैत्रीचा अर्थ होता 
शाळेच्या तासात मागच्या बाकावर खोड्या करणं ,हसणं खिदळण,
एकाच डब्यात मिळून जेवणं,छोट्याशा गोष्टीसाठीही एकमेकांसाठी धावत जाणं.
तीच मैत्री कॉलेजमध्ये गेल्यावर थोडीशी समजूतदार होते,
स्वरूप तेच, पण थोडं परिपक्व...बिनधास्त भटकंती,
आणि हो कोणालाही न सांगता शेअर केलेल्या काही खास भावना देखील...
तेव्हा ‘मैत्री’ हा शब्द केवळ नातं नव्हतं,
तर होती एक आपुलकीची साथ जी मनाशी घट्ट जोडलेली होती.

पण आता?

आजच्या सोशल मीडियाच्या झगमगाटात मैत्री online झाली आहे...
'Active' दिसतो/दिसते तेव्हा मनात येतं 
एक मेसेज करावा का?
पण लगेचच दुसरा विचार 
तोच/तीच का नाही करत मला msg?
मग थोडासा आपलाही ego वर डोक काढतो...
पूर्वी नजरेतून उमजणारी ती नाती,
आज reaction वरून मोजावी लागतात...
"story पाहिली, पण reply नाही दिला..."
"status टाकलाय, पण काहीच बोललं नाही?"
वेळेअभावी आजची मैत्री फक्त व्हॉट्सअॅपच्या Like वर निभावली जाते.फेसबुकवर birthday wish टाकून
"आपण अजूनही जवळ आहोत ,मित्र आहोत हे " असं दाखवलं जातं...
कधी काळी दिवसाचे १० तास एकत्र घालवणारे
आज फक्त forwarded wishes मध्ये "connected" राहतात.
मैत्रीचा ठसा फक्त DP change, tag, आणि memory post मध्ये उरतो.
आजही संवाद असतो, पण तोही अधुरा…भावनांचा स्पर्श नसलेला.
आणि तरीही मन कुठेतरी त्या जुन्या मैत्रीला शोधत असतं.

कधी अचानक एक “Hi” येतो… 
हृदय धडधडतं…
आठवणींच्या झऱ्यात नकळत ओलावा दाटतो…
क्षणभर वाटतं "सगळं तसंच आहे अजून!"
पण लगेचच पुढे संवाद थांबल्याने ,त्या शांततेत हरवतं सगळं कारण,
वेळ नसतो, किंवा priority बदललेली असते.
आयुष्याच्या वाटा वेगळ्या झालेल्या असतात.

कधी कधी वाटतं त्या जुन्या रस्त्यावर पुन्हा एकदा चालावं,
मनसोक्त बोलावं, पुन्हा एकमेकांच्या डोळ्यांत पाहावं…
पण जबाबदाऱ्या, धावपळ या सगळ्या गोष्टी त्यात अडथळा येतात.
आता मित्रांचा आवाज आता फक्त voice note मध्ये ऐकू येतो,
हसणं, रुसणं, समजून घेणं सगळंच virtual झालंय.
पण...
मनात कुठेतरी अजूनही ती ओढ आहे 
फक्त एकदा भेटावं, online नव्हे, तर heart-to-heart बोलावं.
जुन्या फोटोमध्ये दिसणारे चेहरे बदलले असतील,
पण आठवणी? 
त्या आजही ताज्या आहेत ,मैत्री या online जगात हरवत चालली असली, तरी ती पूर्ण संपलेली नसतेच कधी.....
कारण ती मनात, त्या ‘last seen’ पेक्षाही खोल कुठेतरी जिवंत असते.

आज त्या एका मैत्रीसाठी सुरुवात स्वतःपासूनच करा....
थोडासा वेळ काढा,
आलाच फोन समोरून तर फोन उचला,
आणि फक्त एवढंच म्हणा 
 दिवस पूर्वीचे राहिले नसले तरी....आजही आपली मैत्री मनात घर करून आहे...
आणि मैत्रीदिनाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका!!
पाहा ,दुसऱ्या बाजूने येणारा आवाजही
तितकाच ओळखीचा आणि हृदयाला भिडणारा असेल, आपुलकीचा, गहिरा, आणि कायमचा!

मैत्री दिनाच्या आभाळभर शुभेच्छा !!!
@सोनाली कुलकर्णी 

#Friendshipday #मैत्रीदिन #मैत्रीदिनविषेश
(लेख आवडल्यास शेअर नक्की करा पण नाव डिलिट करू नका🙏)

प्रेम असच असत ना...

आणि मग,
त्या कुशीत विसावलेल्या क्षणांना
असतो फक्त आपला श्वास…

तुझ्या केसांतील सुगंध
हळूच माझ्या काळजात घर करतो,
प्रत्येक लहर,
तुझं अस्तित्व माझ्यात रुजवत जाते...

त्या शांत श्वासांत
मी तुला जपतो,
तुझं मूक हास्य,
मनाच्या कोपऱ्यांत गूंजत राहते...

प्रेमाचं नातं असंच असतं ना...
शब्दांशिवाय सांगतं सारं...
हातात हात गुंफून,
आपण मात्र ,
चालत राहतो एकमेकांच्या विश्वात...
श्वासांच्याही पलीकडे...
एकमेकांचे होऊन...
@सोनाली कुलकर्णी 
इंस्टाग्राम @spandankavitaa

#त्याच्यानजरेतून

 #प्रेम #followers #तुझमाझंनात #explorepage #exploremore #followme #ShareThisPost #loveislove
माझ्या आयुष्याचा 7/12


तुझ्या नावावर माझ्या आयुष्याचा ७/१२ केला,
तेव्हा असं वाटलं की ,
माझं सारं काही तुझ्या अस्तित्वात विलीन झालं…
आता आपल्या घराची भक्कम भिंत तू,
आणि त्या भिंतीवर दररोज पडणारा निवांत प्रकाशही तूच,
मी तुझ्या सावलीत स्वतःलाच हरवत गेलेय 
तुझ्या प्रेमात पूर्णपणे विरघळून गेलेय...

हे आपल नातं मालकी हक्काचं कागदोपत्र नाही,
तर विश्वासाच्या साक्षीवर निशब्द, पण शाश्वत वचन आहे.
आता तुझं नाव माझ्या नावाच्या शेजारी ठळकपणे उठून दिसतं,
आणि माझं अस्तित्व एका सुंदर सहीसारखं अधोरेखित झालयं 

तुझ्यासोबत चालताना मी तुला सगळ दिलं...
माझे शब्द, माझे स्वप्न , माझं मीपणही…
आता उरला आहे तो म्हणजे
तुझ्या श्वासात मिसळलेला माझा श्वास...
प्रत्येक क्षणात तो मला पुन्हा तुझ्याजवळ घेऊन येतो ,
आपल्या प्रेमाच्या अंगणात दररोज,
नवं एखादं गीत बनतं,
अगदी
सुंदर , निस्सीम, अनंत...♥️
@सोनाली कुलकर्णी 

#प्रेम #आयुष्याचा_७/१२ #followers #लग्नानंतरच_प्रेम #marriedcouple #marriedlife
दिव्यांची अमावास्या आणि गोड कणकेचे दिवे कसे बनवायचे रेसिपी
आषाढी एकादशी झाली की वेध लागतात ते दीप अमावास्या येण्याचे...
त्या दिवशी .. दिव्यांची पूजा संध्याकाळी झाली की आई आम्हाला ओवळायची आणि आजी बाबांना ओवाळायची आणि गोड कणकेच्या पिठाचे दिवे नेवैद्य म्हणून खायला द्यायची.

खरतरं काही संस्कार हे लहान वयातच घरातून होत असतात...
आजी प्रत्येक सणावाराला जे काही करायची, ते का आणि कशासाठी करते हे सगळं ती आम्हाला समजावून सांगायची. 
तेव्हाही आजीकडे चातुर्मासाचे पुस्तक होते. त्या पुस्तकातील प्रत्येक सणाची कथा ती आम्हाला वाचून दाखवायची आणि त्याबद्दल माहिती द्यायची. आजी आता नसली तरी तिची आठवण मात्र आजही येते.😌

उद्या दीप अमावस्या आहे, म्हणून मला आठवले की एकदा मी आजीला विचारले होते, 'घरात इतके दिवे असताना हे पिठाचे दिवे कशाला करतेस?'
आजीने म्हणाली होती, 'गोड पिठाचे दिवे (कणकेचे दिवे) म्हणजे घरच गव्हाचे पीठ, तूप, गूळ अशा शुद्ध, सात्विक गोष्टी वापरून आपण तयार करतो. ते नुसते दिवे प्रकाशित करत नाही तर ते आपण देवाला नैवेद्य रूपात अर्पण करतो. या गोड पिठाच्या दिव्यांतून प्रेम, श्रद्धा, आदर आणि भक्तीची भावना व्यक्त होते.'

हे गोड पीठाचे दिवे बनवणं खूप सोपं आहे.. 
• अर्धी वाटी गूळ थोड्याशा पाण्यात गरम करून विरघळवून घ्यायचा.गुळ विरघळला की हे गुळाचे पाणी थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे. 

• 1 वाटी गहू पीठ घेऊन त्यात वेलची पावडर ,आवडत असल्यास जायफळ पावडर ,चिमूटभर मीठ घालायचे
 नंतर त्यात गरम दोन चमचा तूप गरम करून तुपाचे मोहन पिठावर घालायचे आणि पिठाला हे तूप चांगले चोळून घ्यायचे म्हणजे, म्हणजे पीठ मऊ होते. 

•सगळ छान मिक्स करून झाले की मग त्यात थोडं थोडं गुळाचं पाणी घालून घट्टसर कणिक मळावी.मळलेली कणिक 10 मिन झाकून ठेवायची म्हणजे कणिक छान मुरते.
• मळलेल्या पिठाचे लिंबाच्या आकाराचे गोळे तयार करून  त्यांना दिव्याचा आकार द्यायचा 
• उकड पात्राला तूप लावून तयार केलेले दिवे अंतर ठेवून थोड्या थोड्या अंतरावर ठेवायचे कारण वाफवल्यानंतर ते थोडे फुगतात . 
दिवे मध्यम आचेवर १२-१५ मिनिटे वाफवून घ्यायचे.

वाफवलेले गरम गरम दिवे तयार झाले की जेव्हा आपण घरातील सगळ्या दिव्यांची पूजा करतो तेव्हा हेही दिवे देवासमोर नैवेद्य म्हणून अर्पण करायचे. प्रत्येक दिव्यात थोडे साजूक तूप आणि फुलवाती घालून ते प्रज्वलित करायचे नंतर हे दिवे प्रसाद म्हणून खायला द्यायचे.  "साजूक तूप आणि गूळ घालून केलेल्या या दिव्यांची चव खूपच छान लागते."

 म्हणूनच दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करण्याची  परंपरा म्हणजे केवळ दिव्यांची पूजा नाही, तर प्रकाशाचं महत्त्व ओळखून अंध:कारावर विजय साजरा करणं आहे. घरातील सगळ्या दिव्यांना स्वच्छ करून त्या दिव्यांची पूजा करणं म्हणजे घरातील प्रत्येक दिव्याला मान देणं, त्यांचं पूजन करणं,  त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन  श्रावण महिन्याला पवित्र सुरुवात होतेय

उद्या प्रत्येकाच्या घरी दिव्यांची पूजा होईल सगळ्यांची घरं पुन्हा एकदा उजळून निघतील... सकारात्मकतेने दिशेने!

'दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम ।
 गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥'

@सोनाली कुलकर्णी 

#दीपअमावास्या #गोडकणकेचेदिवे #followers #deepamawasya 

कणकेचे गोड दिवे कसे बनवायचे?
(टीप : प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते मी माझी मांडण्याचा प्रयत्न केला आहे)
पातळ पोह्याचे दडपे पोहे
आज बऱ्याच दिवसांनी कर्नाटक पद्धतीने पातळ पोह्याचे दडपे पोहे केले..
खरतरं जसा गाव , भाग, राज्य बदलेल तश्या पदार्थांच्या करण्याच्या पद्धती बदलत जातात. तसेच बायकांच्या आयुष्यात सगळ्यात मोठा लग्न झाल्यानंतरचा बदल म्हणजे सासरची पद्धत आणि माहेरची पद्धत...यामध्येच नक्कीच होत.
माहेरी जाड पोह्याचे दडपे पोहे आई बनवायची  त्यामुळे मला तीच पाककृती माहित होती पण सासूबाईंची पध्दत वेगळी...जी खरतर मला खूप आवडली सुद्धा आणि सोईस्कर वाटलीसुद्धा...

तर सांगते.... कर्नाटक पद्धतीने पातळ पोह्याचे दडपे पोहे कसे करायचे ते....

• पातळ पोहे चाळून घेऊन त्यावर चवीनुसार 
लाल मिरची पावडर(तिखट) , मिठ ,चवीनुसार साखर , मेतकूट घालून घ्यायचे.
•त्यानंतर फोडणी करून घ्यायची.
फोडणी मध्ये
तेल ,तेलात मोहरी जिरे,हिंग हळद ,शेंगदाणे , डाळ ,कडीपत्ता घालून खमंग फोडणी करून घ्यायची.आणि ती थंड करून घ्यायची.(या फोडणीमध्ये भाजलेले शेंगदाणे घातले तर अजून टेस्टी लागतात)
•फोडणी थंड झाली की ती पाळत पोह्यांवर घालायची.
आणि पोहे छान हाताने mix करून घ्यायचे.
हाताने mix केले की प्रत्येक पोह्याला तिखट मीठ साखर आणि फोडणी लागते.
याला आमच्याकडे पोहे लावून ठेवणं म्हणतात..😄
आम्ही असे एकदम अर्धा किलो पोहे लावून ठेवतो आणि जेव्हा हवे असेल तेव्हां नंतर दडपून दडपे पोहे करतो.असे केल्याने गडबडीच्या वेळी खूप सोप पडत. फोडणी करण्यापासून सगळ करत बसावं लागत नाही.खूप वेळ वाचतो.

आता दडपे पोहे बनण्यासाठी..
(जर लावलेले पोहे 4 वाटी घेतल्या तर त्याप्रमाणे पुढील साहित्य)
ओल्या नारळाचा चव अर्धी वाटी, काकडी खिसलेली अर्धी वाटी,  एक कांदा ,एक टोमॅटो बारीक चिरून घालायचे, 
आणि हे पोह्यांवर घालून लिंबू पिळायला ,कोथिंबीर घालायची.(मोठा लिंबू असेल तर अर्धा पिळला तरी पुरेसा होतो)
आता पोह्यामधे घातलेले सगळे जिन्नस हाताने छान mix करून घ्यायचे आणि झाकण ठेवून पोहे दडपून 5 मिन ठेवायचे.

हे दडपे पोहे करताना यामध्ये कुठेही पाणी वापरले नाहीये.
कारण ओला नारळ, काकडी ,टोमॅटो, कांदा यामध्ये ओलसरपणा म्हणजेच पाण्याचा अंश असतोच.... त्यामुळे पोहे आपोआप मऊ होतात आणि सर्व चवी पोह्यांमध्ये मुरतात.

5 मिन नंतर ...ह्या दडप्या पोह्यांवर वरून  अगदी थोडेसे ओल खोबरे ,कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
कुणाकुणाला खोबर चालत नाही काकडी चालत नाही तर  ह्या गोष्टी स्किप करून तुम्ही फक्त कांदा टोमॅटो घालू शकता

माझ्या माहेरी दडपे पोहे करण्याची वेगळी पद्धत होती तिथे...सगळ्या गोष्टी घालून झाल्या की वरून फोडणी दिली जाते.
पण ही पद्धत सासूबाईकडून मी शिकले.

जेव्हा सण वार असतो तेव्हा आमच्याकडे हमकास नाश्त्यासाठी हे असे दडपे पोहे बनवले जातात , सण असले की घरी कांदा खात नाही त्यामुळे त्यात फक्त  कांदा घातलेला नसतो.

परवा मी मेथीची रेसिपी टाकली होती त्यावर इतक्या वेगवेगळ्या रेसिपीज मैत्रिणींनी सांगितल्या की मेथीच्या भाजीवर एक पुस्तक निघेल😍 व्हरायटी मध्ये recipes नवीन कळल्या.
आपल्या सगळ्याच मैत्रिणी खूप सुगरण आहेत...❤️

तुमच्याकडे तुम्ही कसे बनवता दडपे पोहे हे नक्की कॉमेंट करून सांगा ..
@सोनाली कुलकर्णी 

She Plans Dinner 

#recipeoftheday #recipe #explorarpage #दडपेपोहे #highlight #follower